महाराष्ट्रातील जिल्हे : अहमदनगर जिल्हा
अहमदनगर जिल्हा
महाराष्ट्रातील जिल्हा. उत्तर अक्षांश १८° २' ते १९° ९' व पू. रेखांश ७३° ९' ते ७५° ५' यांदरम्यान हा वसलेला आहे. क्षेत्रफळ १७,४१२ चौ. किमी.; लोकसंख्या ४५,४३,०८० (२०११). जिल्ह्याच्या पूर्वेस बीड, आग्नेयीस उस्मानाबाद व सोलापूर, दक्षिणेस व नैर्ऋत्येस पुणे, पश्चिमेस आणि वायव्येस ठाणे व नासिक, उत्तरेस नासिक आणि ईशान्येस औरंगाबाद हे जिल्हे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, राहूरी, नेवासे, शेगाव, पारनेर, अहमदनगर, पाथर्डी, श्रीगोंदे, राहाता,जामखेड व कर्जत असे १४ तालुके असून महाराष्ट्राच्या ५·५४ टक्के क्षेत्रफळ व ४·५ टक्के लोकसंख्या आहे.
भूवर्णन:-
गोदावरी व भीमा ह्या या प्रदेशातील मुख्य नद्या होत. गोदावरी प्रथम कोपरगाव तालुक्यामधून व नंतर श्रीरामपूर, नेवासे व शेवगाव तालुक्यांच्या उत्तर सीमांवरून वाहते. प्रवरा ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी अकोला तालुक्यात उगम पावते व नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथे गोदावरीस मिळते. या नदीवर भंडारदरा येथे धरण बांधले असून अनेक पाटबंधारे काढलेले आहेत. मुळा, अदुला व महाळुंगी या प्रवरा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या असून, धोरा ही गोदवारीची आणखी एक उपनदी नगर शहराच्या उत्तरेला आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सर्व भाग भीमेच्या खोऱ्यात येतो. भीमा नगर-पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर फक्त ५६ किमी. वाहते. परंतु घोड, सीना व कुकडी या तिच्या प्रमुख उपनद्यांचे जिल्ह्याच्या दक्षिण भागात जाळे आहे. नगरजवळील पिंपळगावचा तलाव शहरास पाणीपुरवठा करतो व विसापूरचा तलाव शेतीसाठी उपयुक्त आहे.
जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोरडे व उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यात सरासरी ३९·५० से. तर हिवाळ्यात १३·५० से. तपमान असते. जिल्ह्याच्या बऱ्याच मोठ्या प्रदेशात वार्षिक ५०·८ सेंमी. ते ६३·५ सेंमी इतका कमी पाऊस पडतो. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवरील सह्याद्रीवर ५०८ सेंमी. पाऊस पडतो, तर फक्त ४५ किमी. पूर्वेस वसलेल्या अकोला गावी ५५·९ सेंमी. पडतो. अकोल्याच्या पूर्वेस तो आणखी कमी होत जातो. यामुळेच जिल्ह्यात दर तीन किंवा सहा वर्षांतून एकदा तरी दुष्काळ येतो. थोड्याफार पावसामुळे पश्चिमेकडील अकोला आणि नद्यांच्या व पाटबंधाऱ्यांच्या पाण्यामुळे उत्तरेकडील श्रीरामपूर, राहुरी, नेवासे व शेवगाव हे तालुके मात्र दुष्काळमुक्त आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती नाहीशी करण्याच्या दृष्टीने शासनाने घोड, मुळा व कुकडी हे प्रकल्प हाती घेतले आहेत.
आर्थिक स्थिती:-
सुपीक जमिनीमुळे व पाण्याच्या सोयीमुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांत अनेक साखरकारखाने, कापूस—पिंजणी आणि—दाबणी कारखाने, तेल-गिरण्या, अभियांत्रिकी कारखाने, गूळ आणि विड्या तयार करण्याचे कारखाने आहेत. जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी सहा कोपरगाव तालुक्यात, चार श्रीरामपूर तालुक्यात, दोन श्रीगोंदे तालुक्यात व एक राहुरी तालुक्यात आहे. श्रीरामपूर व कोपरगाव ही साखरकेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. अहमदनगर शहर हे कापूस-पिंजणी व-दाबणी, तेल, विड्या, अभियांत्रिकी, यंत्रमाग, आयुर्वेदीय औषधे, तांब्या-पितळेची भांडी इत्यादींच्या कारखान्यांकरिता प्रसिद्ध आहे. संगमनेर व अकोला या तालुक्यांत आणि जामखेड महालात काचेच्या बांगड्या तयार करतात. याशिवाय जिल्ह्यातील ग्रोमोद्योगांत लोकर विणणे व कातणे, तेलघाण्या, तांदूळ सडणे, कागद, साबण, कोळसा तयार करणे, चामडी कमाविणे व त्यांच्या वस्तू बनविणे वगैरे अनेक उद्योग आढळतात. १९६० मध्ये जिल्ह्यात असे एकूण ३,५०० हून अधिक उद्योगधंदे होते. जिल्ह्यात मुख्यत: मीठ, नारळ, सुपारी, कापड व कापडाचा माल, सूत, तांबे आणि इतर धातूंच्या वस्तू, काचसामान, लोखंडी सामान इ. माल आयात केला जातो, तर बाजरी, ज्वारी, हरभरा, गळिताची धान्ये, भुईमूग, साखर, गूळ, ऊस, काकवी, सरकी, कापूस, शिंगे, कातडी, मिरच्या वगैरे माल निर्यात होतो.
दक्षिण-मध्य रेल्वेचा दौंड-मनमाड फाटा कोपरगावपासून अहमदनगरमार्गे जिल्ह्यातून १९६·३० किमी. जातो. हे प्रमाण दर १०० चौ. किमी. ला १·८८ किमी. असे पडते. सडकांची लांबी ४,११६·३५ किमी. (१९६७) असून त्यापैकी १२५·९८ किमी. सिमेंट-कॉक्रीटचे व २४२·९९ किमी. डांबरी आहेत. पुणे-संगमनेर-नासिक हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून ६१·१८ किमी. जातो.तालुक्यांच्या सर्व शहरांशी व शेजारील जिल्ह्यांच्या मुख्य ठिकणांशी अहमदनगर शहर सडकांनी जोडलेले आहे.
लोक व समाजजीवन:-
जिल्ह्यात १९६८-६९ मध्ये २,०६६ प्रथमिक शाळा, २०२ माध्यमिक शाळा, १२ महाविद्यालये व १७ विविध शिक्षण देणाऱ्या संस्था होत्या. अहमदनगर येथे एक आयुर्वेदीय महाविद्यालय असून राहुरी येथे १९६८ मध्ये महात्मा फुले कृषिविद्यापीठ उघडण्यात आले आहे. तालुकागावी दवाखान्यांच्या सोयी असून अहमदनगर शहरात तीन रुग्णालये आहेत. जिल्ह्यात ५० मुद्रणालये असून एक दैनिक, १३ साप्ताहिके, ६ मासिके आणि ७ नियतकालिके आहेत. २१ चित्रपटगृहे असून त्यांतील १३ कायमस्वरूपी आहेत.
अहमदनगर जिल्हा हा पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात मोडत होता असे म्हणतात; म्हणून पूर्वीच्या काळी घडलेल्या बऱ्याच घटनांचा या भूमीशी संबंध जोडला जातो. जटायूकथा ही या भागातील पट्टा किल्ल्यावर घडल्याचे सांगतात; श्री अगस्तीची यात्रा आजही अकोल्याशेजारील आगर येथे महाशिवरात्रीस भरते; पाथर्डी तालुक्यात पांडवकालीन अवशेष दाखवितात. शालिवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) जिल्ह्याला लागूनच असल्यामुळे जिल्ह्यात तत्कालीन अवशेष सापडतात. नेवासे उत्खननातील अवशेष त्यांपैकीच आहेत. पुणतांबे शालिवाहनकाळापासूनच प्रसिद्ध आहे. नेवासे येथे मोहिनीराजांचे प्राचीन प्रसिद्ध मंदिर आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथेच लिहिली. पंधराव्या शतकात अहमदनगरला स्थापन झालेल्या निजामशाहीचा इतिहास सांगणाऱ्या नगरचा किल्ला, चांदबिबीचा महाल, मलिक-इ-मैदान तोफ इ. कित्येक वास्तू आजही व्यवस्थित आहेत. पेशवाईत गाजलेला विठ्ठल सुंदर (साडेतीन शहाण्यांपैकी एक) संगमनेरचा, तर त्रिंबकजी डेंगळे निमगाव जाळीचा. नाथसंप्रदायी कानिफनाथांची समाधी मढी येथे आहे. संत साईबाबांची शिर्डीला समाधी असल्यामुळे ते तीर्थक्षेत्र बनले आहे. अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेकला आहे. राशिन येथील देवी व दीपमाळ प्रसिद्ध आहे. शिंगणापूरला शनीचे जाज्वल देवस्थान असून त्याच्या प्रतापामुळे गावात चोरी होत नाही, या श्रद्धेमुळे तेथील दारांना कड्याकुलपे नाहीत. अहमदनगरजवळचा डोंगरगण, भंडारदरा, रंधा धबधबा व साखर कारखाने ही जिल्ह्यातील आधुनिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.