चालू घडामोडी : ४ डिसेंबर २०१७

मुंबईच्या ईटीसीला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार :
  • अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापालिकेच्या अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राला(ईटीसी) 3 डिसेंबर रोजी 'सर्वोत्कृष्ट संस्था' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील शानदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉ. एन.रामास्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
  • पुरस्कार प्रदान केल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी नवी मुंबई महापालिकेच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी विशेषता असते. ती ओळखून आपण त्यावर भर दिला पाहिजे, असे सांगतानाच कोविंद यांनी दिव्यांगांमधील विशेषतांचा सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त संस्थांचे कौतुक करत त्यांचे कार्य इतरांसाठी प्रोत्साहन देणारे ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
  • केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था, दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठी आदर्श व्यक्ती, संशोधन करणाऱ्या संस्था अशा विविध 52 श्रेणींमध्ये व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देण्यात आले.
  • तसेच यात दिव्यांगांचे भावनिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाकरिता कार्य करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी केंद्राला गौरवण्यात आले.

इराणमधील चाबहार बंदराचे उद्घाटन :
  • भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे 3 डिसेंबर रोजी इराणचे अध्यक्षहसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ 80 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.
  • उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इराण, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्यासह अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या वतीने सागरी वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री पोन राधाकृष्णन हे उपस्थित होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2016 मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्याचा त्रिपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार भारत इराणला चाबहार बंदर विकसित करण्यास मदत करणार आहे.
  • तसेच इराणमधून पुढे अफगाणिस्तानमधील झरंज आणि देलाराममार्गे थेट काबुलपर्यंत रस्ता व रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. याशिवाय चाबहारच्यापुढे मध्य आशियातील देश आणि थेट रशियाशी संपर्क साधण्याची योजना आहे.
सहा व्दिशतके करणारा विराट पहिला कर्णधार :
  • विक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने 3 डिसेंबर रोजी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे व्दिशतक झळकावून त्याने सर्वाधिक व्दिशतके करणारा कर्णधारम्हणून आपली ओळख निर्माण केली.
  • श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 238 चेंडूत व्दिशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 20 चौकारांचा समावेश होता. विराटने 2 डिसेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
  • भारताकडून सर्वाधिक व्दिशतके करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग (6 व्दिशतके) यांच्या नावावर होता. विराटने यांची बरोबरी केली आहे. याबरोबरच एकपाठोपाठ एक व्दिशतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध 224 आणि झिंबाब्वेविरुद्ध 227 धावा केल्या होत्या.
आयआयटीच्या विद्यार्थ्याला सव्‍वा कोटीचे वार्षिक पॅकेज :
  • मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर निर्मितीतील नामांकित कंपनीने मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्याला तब्बल एक कोटी 38 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. दोन वर्षांतील हे सर्वांत मोठे पॅकेज असून, यंदा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुंबई आयआयटीकडे रांगा लागल्या आहेत. उबरने 99 लाखांचे पॅकेज दिले आहे; मात्र याला दुजोरा मिळाला नाही.
  • आयआयटी मुंबईचे कॅम्पस सिलेक्‍शन 1 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. मायक्रोसॉफ्टने चार विद्यार्थ्यांना अंतिम मुलाखतीसाठी निवडले होते. त्यातील एकाला तब्बल एक कोटी 38 लाखांचे पॅकेज दिले आहे.
  • भारतातील विभागासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला 39 लाखांचे पॅकेज मायक्रोसॉफ्टने दिले आहे. ब्लॅकस्टोन या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात सर्वाधिक म्हणजे 45 लाखांचे पॅकेज दिले आहे.
  • तसेच पहिल्या टप्प्यात मायक्रोसॉफ्ट आणि जपानच्या एनईएस या कंपन्यांनी परदेशात काम करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 
दिनविशेष :
  • 4 डिसेंबर हा दिवस 'नौदल दिन' म्हणून पाळला जातो.
  • भारताचे 11 पंतप्रधान 'इंद्रकुमार गुजराल' यांचा जन्म 4 डिसेंबर 1919मध्ये झाला.
  • 4 डिसेंबर 1924 मध्ये 'गेटवे ऑफ इंडिया' या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
  • सन 1971 मध्ये 4 डिसेंबर रोजी 'भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट' भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

  • ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
  • १९८४मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्यांची तब्येतही सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
  • शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकातामध्ये झाला होता. त्यांनी १९४०मध्ये बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
  • त्यांनी आतापर्यंत १६० सिनेमांमध्ये काम केले. त्यात १४८ हिंदी आणि १२ इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे.
  • निर्माते म्हणून त्यांनी जुनून (१९७८), कलियुग (१९८०), ३६ चौरंगी लेन (१९८१), विजेता (१९८२), उत्सव (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली.
  • ६० आणि ७०च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले.
  • फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.
  • २०११मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच २०१५मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

  • भारताने इराणमध्ये विकसित केलेल्या चाबहार या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते झाले.
  • या बंदरामुळे पाकिस्तानला वळसा घालून इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापारासाठी वाहतुकीचा नवा मार्ग खुलाहोणार आहे.
  • तसेच या बंदरामुळे मध्य आशियातील देशांशी व्यापारही आता वेगाने आणि अधिक सुकर होणार आहे.
  • या प्रकल्पाचा करार १५ वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता.
 चाबहारचे महत्त्व 
  • इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेलेचाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्तठरणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्यासाठी चाबहार बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
  • भारताने गतवर्षी या बंदराच्या विकासासाठी ५०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यातून चाबहार बंदराचा विस्तार करण्यात येत आहे. 
  • या बंदराची माल हाताळण्याची क्षमता पूर्वी वर्षांला २.५ दशलक्ष टन इतकी होती. आता ती वर्षांला ८.५ दशलक्ष टन इतकी वाढवण्यात आली आहे.
  • चीनचा अरबी समुद्रामधील वाढता वावर पाहता भारतालाही येथे आपले स्थान निर्माण करण्याची गरज होती. चाबहार बंदरामुळे भारताला अरबी समुद्रक्षेत्रामध्ये भक्कम स्थान प्राप्त होईल.
  • चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित करत आहे. हे बंदर चाबहार पासून समुद्रमार्गे केवळ १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.
  • चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
  • त्याचप्रमाणे रशिया, युरोप, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत आता पोहोचू शकेल.
  • अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे.
  • चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधीलइंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे.

Archive

Contact Form

Send