चालू घडामोडी : १७ डिसेंबर २०१७
नासाने शोधली आठ ग्रहांची नवी सूर्यमाला :
- 👉 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ला मोठं यश मिळालं आहे.'केपलर स्पेस टेलिस्कोप'द्वारे नासाने पृथ्वी इतक्याच मोठ्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत.
- 👉 ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून 2 हजार 545 प्रकाशवर्षे दूर आहे. नवी सूर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी मोठी आहे.
- 👉 पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
- 👉 पण आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही ‘केप्लर 90’ नावाच्या ताऱ्याभोवती इतर ग्रह फिरताना दिसत आहेत.
- 👉 आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह ता-यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह ता-यापासून दूर आहेत.
- ई-वे बिल यंत्रणा 1 जूनपासून कार्यान्वित :
- 👉 अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली.
- 👉 त्यात ई-वे बिल पद्धती सुरू करण्यासाठीची संगणक यंत्रणा (सॉप्टवेअर आणि हार्डवेअर) तयार आहे की नाही याचा आढावा घेतला गेला.
- 👉 देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी मूल्यवर्धित कर (व्हॅट) अधिकाऱ्यांकडून वाहतूकदारांना माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठीचा परवाना दिला जात असे.
- 👉 जीएसटी लागू झाल्यापासून त्या यंत्रणेत बदल करून हा परवाना प्रत्यक्ष कागद स्वरूपात देण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ई-वे बिल) देण्याचे ठरले. मात्र त्यासाठी आवश्यक ती संगणक यंत्रणा तयार आहे की नाही ते तपासणे आवश्यक होते.
- 👉 देशव्यापी ई-वे बिल यंत्रणा 16 जानेवारी 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास तयार असेल, असे अर्थ खात्याच्या पत्रकात म्हटले आहे.
नववधूला मिळणार मोबाईल आणि 35 हजार रुपये :- 👉 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये लग्न करण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठीच्या योजनेत बदल केले आहेत.
- 👉 नवीन योजनेनुसार आता सामूहिक विवाह सोहळ्यात बोहल्यावर चढणाऱ्या नववधूला तीन हजार रुपयांचा मोबाईल फोनही सरकारकडून देण्यात येईल.
- 👉 मोबाईल फोन शिवाय लग्न करणाऱ्या मुलीला 35 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
- 👉 सध्या ही योजना वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.
- 👉 योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला 20 हजार रुपये रोकड दिली जाईल. हे पैसे थेट त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
- 👉 तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असे एकूण 10 हजाररुपयांचे सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल.
एच-1बी धारकाच्या जोडीदारास अमेरिकेत नोकरी नाकारणार :- 👉 एच 1 बी पारपत्रधारक व्यक्तीच्या जोडीदाराला यापुढे अमेरिकेत नोकरी करता येणार नाही, असा नवीन नियम ट्रम्प प्रशासन करणार आहे.
- 👉 ओबामा यांच्या काळात दोघांनाही नोकरीची परवानगी होती, पण आता एच 1 बी पारपत्र असलेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला काम करता येणार नाही.
- 👉 2015 पासून एच 1 बी पारपत्र दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जोडीदारालाही नोकरीची संधी मिळत असे.
- 👉 एच 1 बी पारपत्रधारकांना ग्रीनकार्ड मिळण्याची सोय असून, जोडीदाराला एच 4 पारपत्र अंतर्गत काम करण्याची संधी मिळत होती, हा नियम ओबामा प्रशासनाच्या वेळी लागू होता.
दिनविशेष : - 👉 1777 : फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
- 👉 1928 : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
सिंधूला वर्ल्ड सुपर सीरिजचे उपविजेतेपद
- भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला दुबई वर्ल्ड सुपर सीरिजच्या उपविजेतेपदावर (रौप्यपदक) समाधान मानावे लागले.
- अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १५-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव करत दुबई वर्ल्ड सुपर सीरीजचे जेतेपद पटकावले.
- या स्पर्धेच्या गट लढतीत सिंधूने यामागुचीवर सरळ गेममध्ये मात केली होती. त्यामुळे फायनलमध्येही सिंधू वरचढ ठरेल असा अंदाज होता.
- ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सिंधूने यापूर्वी इंडिया ओपन सुपर सीरिज आणि कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर नाव कोरले होते.
- वर्ल्ड सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत जगातील अव्वल आठ बॅडमिंटनपटू भाग घेतात. ही स्पर्धा जिंकण्यात सिंधूला यश आले असते, तर ही मानाची व आव्हानात्मक स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली असती.
- सायना नेहवालने २०११मध्ये तर ज्वाला गुट्टा-व्ही डिजू या जोडीने २००९मध्ये या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती; पण त्यांनाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
एअरटेलचा ई-केवायसी परवाना रद्द
- मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास यूआयडीएआय भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेला तात्पुरती बंदी केली आहे.
- ‘युनिक आयडेन्टिटी अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) हे भारतीय नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणारे प्राधिकरण आहे.
- एअरटेलच्या मोबाइल फोनधारकाने त्याचे सिमकार्ड ‘आधार’शी जोडून घेतले की त्याच डेटाचा वापर करूनएअरटेल बँकेत त्याचे खाते नको असताना उघडले जाते.
- तसेच त्या ग्राहकास मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदानही परस्पर त्या खात्यात वळते होते, अशा असंख्य तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने हा अंतरिम मनाई आदेश जारी केला आहे.
- सिमकार्डांची ‘आधार’शी जोडणी सक्तीची केल्यापासून त्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल कोणाही मोबाइल फोन कंपनीविरुद्ध असा आदेश काढला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- आत्तापर्यंत सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी केलेल्या एअरटेलच्या सुमारे २३ लाख ग्राहकांची खाती एअरटेल बँकेत उघडली गेली असून त्यात गॅसच्या अनुदानाचे सुमारे ४७ कोटी रुपये परस्पर जमा झाले आहेत.
- या अंतरिम आदेशाने प्राधिकरणाने भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांचे ई-केवायसी परवाने तूर्तास निलंबित केले आहेत.
- परिणामी हा आदेश लागू असेपर्यंत एअरटेल त्यांच्या ग्राहकांच्या सिमकार्डाच्या ‘ई व्हेरिफिकेशन’साठी ‘आधार’ कार्डाचा आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेचा वापर करू शकणार नाही.
- तसेच सिम व्हेरिफिकेशनसाठी प्राप्त झालेल्या ‘आधार’च्या माहितीचा उपयोग करून एअरटेल पेमेंट बँक त्या ग्राहकाचे त्याच्या संमतीविना खातेही उघडू शकणार नाही.
कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना शिक्षा
- कोळसा घोटाळ्यात दोषी ठरलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
- त्यांच्याशिवाय माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह आणखी चौघांनाही यात दोषी ठरवले होते.
- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळ्यात अनियमित पद्धतीने खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्याने कोडा यांच्यासह इतर आरोपींना कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते.
- २००६ मध्ये कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्रीम्हणून शपथ घेतली होती. मुख्यमंत्री होईपर्यंत ते अपक्ष आमदार होते.
- त्यांनी ऑल झारखंड स्टुडंट युनियनपासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही क्रियाशील होते.
- बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रीपदाची सूत्रे स्विकारली होती.
- २००५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते.
- या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहूमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन दिले होते.
- सप्टेंबर २००६मध्ये मधू कोडा यांच्यासहित अन्य ३ अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे अल्पमतात आलेले भाजपा सरकार पडले. यानंतर युपीएने त्यांना मुख्यमंत्रीपद देत आपले सरकार स्थापन केले होते.
- याआधी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची योग्य माहिती न दिल्याने मधू कोडा यांच्यावर तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.
