चालू घडामोडी : ११ डिसेंबर २०१७
स्टेट बँकेने 1300 शाखांची नावे आणि कोड बदलले :
- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) आपल्या सुमारे 1300 शाखांची नावे आणि IFSC कोड बदललेआहेत.
- स्टेट बँकेच्या सर्व सहयोगी बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- मुंबई, दिल्ली, बेंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या शहरांमधील बहुतांश बँकेच्या शाखांच्या नावात हे बदल करण्यात आले आहेत.
- तसेच यासंदर्भात स्टेट बँकेचे प्रबंध निदेशक (डिजिटल बँकिंग) प्रवीण गुप्ता यांनी सांगितले, आमच्या काही जुन्या सहयोगी बँकांच्या शाखांचे भारतीय स्टेट बँकेत विलिनिकरण करण्यात आले आहे. हे विलिनिकरण झाल्याने त्यांच्या IFSC कोडमध्ये देखील बदल झाले आहेत.
- महाराष्ट्राची कन्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार :
- 'एमपीएससी' परीक्षेमधील यश, 'सीबीआय'मध्ये अधीक्षकपदी निवडअशा महत्त्वाच्या संधी नाकारत चाकोरीबाहेर जाण्याची जोखीम पत्करणारी महाराष्ट्राची कश्मिरा पवार आता पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे.
- साताऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील या 24 वर्षीय युवतीने 'मेक इन इंडिया' आणि 'ग्रामीण विकास' प्रकल्पांतर्गत केलेल्या कामगिरीची दखल घेतल्याने यापुढे ती आता विविध क्षेत्रांतील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे.
- केंद्र सरकारच्या वतीने विविध क्षेत्रांतील विकासासाठी काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत कश्मिराने भाग घेतला. त्यात पंतप्रधान कार्यालयाच्या 'मेक इन इंडिया' प्रकल्पात तिने प्रथम क्रमांक मिळविला.
- 'मेक इन इंडिया' व ग्रामीण विकास या दोन प्रकल्पांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभला. तिने तयार केलेल्या 'सोशल असिस्टंट प्रोग्राम'ला पेटंट देऊन ही योजना केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यास सुरवात केली.
- ग्रामीण विकासाच्या प्रकल्पातून तिने सुचविलेल्या 'स्मार्ट व्हिलेज'ची योजना उत्तर प्रदेशात राबविण्यास सुरवात झाली आहे. 'एमपीएससी'मधून तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नुकतीच निवडही झाली आहे आणि पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रीय सल्लागार म्हणूनही निवड झाली.
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड :- बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली.
- संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला.
- साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427मते; तर डॉ. शोभणे यांना 357 मते मिळाली. गेल्या दहा दिवसांपासून देशमुख आणि शोभणे यांच्यातच खरी चुरस असल्याचे स्पष्ट झाले होते.
- लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पाठीशी मराठवाडा, तर शोभणेंच्या पाठीशी विदर्भ होता. याव्यतिरिक्त दोघांनीही मुंबई व पश्चिम महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील मते मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यात बडोद्यातील आयोजक संस्थेची मतेही दोघांना विभागून मिळाली असावी, असा अंदाज आहे; पण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मते देशमुखांना मिळाल्यामुळे विजय सोपा झाला.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूर मनियार यांचा गौरव :- पालीतील सामाजिक कार्यकर्ते गफूर महम्मुद मनियार यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल रायगड जिल्हा मुस्लिम वेलफेअर ऑर्गनायजेशन (फलाही तन्जीम) यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृह खोपोली येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक आणि जागतिक किर्तीचे नामवंत उद्योजक हासन चौंगले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
- विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या पंधरा समाजसेवकांचा सत्कार या कार्यक्रमात केला गेला. गफूर मनियार यांनी मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी अमुल्य योगदान दिले आहे.
- सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात त्यांचा हिरीरिने सहभाग असतो. त्यांनी आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास खतिबे कोकण अली एम. शम्सी यांच्या भाषणाने सुरुवात झाली.
- भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष हाजी जावेद पाशा कुरेशी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुस्लिम समाजबांधवांनी आपल्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि तरुणांना उच्चशिक्षित बनण्याचे आवाहन केले.
इराकच्या सीमा आयसिसकडून मुक्त :- इराकमधून 'आयसिस'चा नायनाट करण्यात आला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून 'आयसिस'विरोधात इराकचा लढा सुरू होता. सीरियाच्या सीमेजवळ असलेल्या वाळवंटाच्या भागात धडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर इराकने 'आयसिसविरुद्ध'चा लढा यशस्वीपणे संपल्याचे जाहीर केले.'आयसिस'विरुद्धच्या लढाईत इराकी सैन्याला अमेरिकी सैन्याची साथ मिळाली.
- इराकचे पंतप्रधान हैदर अली अबादी यांनी बगदादमध्ये पत्रकार परिषद घेऊन 'आयसिस'विरोधातील सैन्याची कारवाई संपल्याचे जाहीर केले.
- देशाच्या सीमा आता पूर्णपणे आमच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत, असा दावा हैदर यांनी केला. सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही सैन्याची 'आयसिस'विरोधातील कारवाई पूर्ण झाल्याचे सांगितले.
दिनविशेष : - भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ 'प्रणवकुमार मुखर्जी' यांचा जन्म 11डिसेंबर 1935 मध्ये झाला.
- 11 डिसेंबर 1946 मध्ये युनिसेफ (UNICEF) ची स्थापना झाली.
- 11 डिसेंबर 1969 हा दिवस भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता 'विश्वनाथन आनंद' यांचा जन्मदिन आहे.
- 11 डिसेंबर 2001 मध्ये चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश झाला.
क्रिकेट विश्वचषक २०२३चे यजमानपद भारताला
- २०२३चा वनडे विश्वचषक आणि २०२१ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. तर २०१९चा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे.
- भारताने याआधी १९८७, १९९६ आणि २०११मध्ये वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषविले आहे; पण त्यावेळी भारत आशिया खंडातील देशांसह संयुक्त यजमान होता. २०२३मध्ये मात्र विश्वचषक संपूर्णपणे भारतातचहोईल.
- १९८३ आणि २०११मध्ये भारताने विश्वचषक जेतेपदपटकावले. २०१५साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते.
- याशिवाय भारत अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपदही भूषविणार आहे. २०१९-२०२०मध्ये हा सामना भारतात होईल.
- १९८७च्या चौथ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयुक्तरीत्यायजमानपद होते.
- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. भारताने या स्पर्धेत उपांत्यफेरीत धडक मारली होती.
- सहावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९६मध्ये भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडली.
- श्रीलंकेने लाहोर येथील गडाफी मैदानावर ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषक प्रथमच क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.
- २०११मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशात पार पडलेल्या दहाव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने या विश्वचषकावर नाव कोरले.
- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. यामुळे यजमान संघाने विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला.
- तर दोन आशियायी संघांनी अंतिम सामन्यात धडक मारण्याची ही क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलीच घटना होती.
काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.
- सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते सर्व राहुल गांधी यांच्या नावाचे होते.
- राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. १६ डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.
- यापूर्वी या घराण्यातील मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते.
- ७१ वर्षीय सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे सलग १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे.
द. आफ्रिकेचे स्वातंत्र्य सेनानी लालू इसू छिबा यांचे निधन
- दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठी कामगिरी केलेले लालू इसू छिबा यांचे ८ डिसेंबर रोजी निधन झाले.
- त्यांचा जन्म १९३०मध्ये जोहान्सबर्ग येथे झाला, तेथेच ते लहानाचे मोठे झाले. ते मूळ भारतीय वंशाचे म्हणजे गुजराती होते.
- १९५६च्या देशद्रोहाच्या खटल्याने त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. नंतर ते ट्रान्सवाल इंडियन काँग्रेसमध्ये दाखल झाले. तेथून त्यांचा प्रवास दक्षिण आफ्रिकन कम्युनिस्ट पक्षाकडे झाला.
- दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ातील एमके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंडखोर सेनेचे ते प्लॅटून कमांडर होते. १९६३मध्ये ते विल्टन मॅकवायी यांच्यानंतर या सेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले.
- १९५६च्या देशद्रोहाच्या खटल्यातील विल्टन मॅकवायी हे एक आरोपी होते. त्यांच्यापासूनच छिबा यांनी प्रेरणा घेतली.
- दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ात लिटल रिव्होनिया खटला विशेष गाजला होता. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला कलाटणी मिळाली.
- या खटल्यात त्यांना १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यासाठी त्यांना रॉबेन आयलंड येथील तुरुंगातटाकण्यात आले. त्या वेळी नेल्सन मंडेलाही त्यांच्यासमवेत होते.
- छिबा व मॅक महाराज यांनी तुरुंगवासात असताना मंडेला यांचे ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे आत्मचरित्र जगासमोर आणण्यात मोठी भूमिका पार पाडली.
- १९८२मध्ये सुटका झाल्यावर छिबा हे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये कार्यरत राहिले व त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे काम भूमिगत राहून चालू ठेवले.
- अहमद कॅथरडा हे त्यांचे मित्र व राजकीय गुरू होते. त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या कॅथरडा फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते.
- १९९४ व १९९९ अशा दोन्ही निवडणुकांत ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसकडून संसदेत निवडून आले.
- वंश, लिंगभेदाविरोधात त्यांनी जो लढा दिला त्यातूनच लोकशाही दक्षिण आफ्रिकेच्या घडणीस मदत झाली.
- त्यामुळे त्यांना ऑर्डर ऑफ लुथुली हा दक्षिण आफ्रिका सरकारचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
