Merry Christmas !!! नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

नाताळच्या शुभेच्छा! मेरी ख्रिसमस.!
---------------------------
           ईश्वराने मानवांच्या उद्धारासाठी मानवरूप धारण केले; याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ख्रिश्चन धर्मियांत ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. इंग्रजीमध्ये नेटिव्हिटी म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म. त्यावरून अपभ्रंश होत "नाताळ" हा शब्द रुढ  झाला;असे म्हणतात. आणि 'ख्रिस्ताचा मास' म्हणजे सामुदायिक इशोपासना यावरून सोळाव्या शतकात "ख्रिसमस" हा शब्द वापरला जाऊ लागला.
            खरतर २४ डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच या सणाला सुरुवात होते. या संध्याकाळला "ख्रिसमस ईव्ह" असे म्हणतात. २४ डिसेंबरच्या संध्याकाळी सर्व लहानथोर ख्रिश्चन चर्चच्या आवारात नटून थटून एकत्र येतात. या काळात चर्च दिव्यांच्या रोषणाईने सजवलेले असते. चर्चच्या आवारात ख्रिस्त जन्माचे देखावे तयार केले जातात. विविध रंगाच्या चांदणीच्या आकाराच्या अकाश कंदील घरोघरी लावले जातात. यालाच "डेव्हिडचा तारा" असे म्हटले जाते. मिष्टान्न म्हणून विविध प्रकारचे केक्स, डोनट्स बनवले जातात. याबरोबरच परस्परांना भेटवस्तू देणे, शुभेच्छापत्र पाठवणे, फटाक्यांची आतषबाजी करणे इत्यादी प्रथा जगभरच पाळल्या जातात.
           ख्रिसमस ईव्हच्या दिवशी संध्याकाळपासूनच चर्चच्या आवारात जमलेले ख्रिश्चन बांधव नाचगाण्यात मशगूल होतात. याच दिवशी रात्री बारा वाजता चर्चमध्ये घंटानाद केला जातो. तो ऐकताच जमलेला जनसमुदाय परस्परांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात.खास नाताळसाठी  म्हणून भक्तिगीते रचली जातात. त्यांना "ख्रिसमस कॅरोल्स" असे म्हणतात. ती  गात लहानमुले, युवकयुवती रात्री १२ ते ४ पर्यंत एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. येशूच्या पाळणाघराचे दृश्य प्रथम तयार करणार्‍या सेंट फ्रान्सिस यांनीच पहिली कॅरोल्सही तयार केली. त्यांना कॅरोल्स प्रथेचा जनक म्हटले जाते. तेराव्या शतकात इटलीमध्ये प्रथम कॅरोल्स गायनाची प्रथा सुरु झाली.

 

           २४ डिसेंबरच्या रात्रीपासून चर्च व घरोघरी दिसणार्‍या पाळणाघराच्या दृश्याबरोबरच रोषणाई केलेला ख्रिसमस वृक्षही सर्वत्र पहायला मिळतो. फर नावाच्या वृक्षाची ती प्रतिमा असते. फर हा वृक्ष सदाहरित असतो. तसेच त्याचा आकार चर्चच्या शिखरासारखा वर निमुळता होत गेलेला असतो. म्हणून "ख्रिसमस वृक्ष" म्हणून फरच्या झाडाला मनाचे स्थान दिले जाते. सफलतेचे प्रतिक म्हणून त्याची पूजा सर्वत्र केली जाते. सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथरने जर्मनीतील  स्वतःच्या घरात मेणबत्त्यांनी सजवलेला फर वृक्ष उभा केला. तेव्हापासून ही प्रथा सर्वत्र रुढ झाली.
            नाताळ सणाच आणखी आकर्षण म्हणजे 'सांटाक्लॉज'. चौथ्या शतकात आशिया मायनर मध्ये सेंट निकोलस नावाचे बिशप होते. स्थूल शरीर, पांढरीशुभ्र दाढी आणि सदैव हसतमुख असलेले हे बिशप सत्कृत्ये आणि मुलांबद्दलचे अपार प्रेम या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. सांटाक्लॉजच्या रुपाने नाताळ सणात त्यांची आठवण काढली जाते. ख्रिसमस ईव्हच्याच दिवशी घरातील घरातील मुले 
झोपण्यापूर्वी घरातील प्रमुख ठिकाणी पायमोजे लोंबत ठेवतात. रात्रीच्या वेळी सांटाक्लॉज धुरांड्यातून उतरून पायमोज्यात खेळणी, खाऊ, पोषाख अशा नाना वस्तू ठेवून जातो अशी मुलांची समजूत करून दिली जाते. या सांटाक्लॉजला इंग्लंडमध्ये "फादर ख्रिसमस" तर हॉलंडमध्ये "सेंट निकोलस" असे नाव आहे.





"MPSC GUIDE APP च्या सर्व युजरांना नाताळ म्हणजेच ख्रिसमस च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा"
तुम्हाला हे नवं वर्षं यशस्वी, सुखदायी, आनंदी, निरोगी, जावो, ही ईश्वर चरणी प्रार्थना"
-MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send