अवघ्या एक मार्काने आयुष्य बदलले-MPSC टॉपर प्राची भिवसे

एसटीआय आणि राज्यसेवा परीक्षेत एका गुणाने मागे पडले आणि ते जिव्हारी लागले. एवढा अभ्यास करून एका गुणाने गुणवत्ता यादी हुकल्याची खंत लागून राहिली. त्यातून निराश न होता पुन्हा जिद्दीने अभ्यास केला आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आले, याचा निश्‍चित अभिमान असल्याचे प्राची सखाराम भिवसे हिने सांगितले.

एसएससी बोर्डजवळील पद्मा कॉलनीतील रहिवासी असलेल्या भिवसे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्राची राज्यात पहिली आल्याची बातमी समजताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी तिच्या अभिनंदनासाठी गर्दी केली. प्राचीचे वडील कामानिमित्त परगावी होते. आपल्या यशात सर्वाधिक वाटा वडिलांचा असल्याचे तिने नमूद केले.

आई सुनीता म्हणाल्या, की प्राची एका गुणाने मागे पडली, त्या वेळी आम्हालाही क्षणभर विश्‍वास बसला नाही. त्या दिवशी रात्री आम्हाला झोप लागली नाही. पहिली ते बारावीपर्यंत तिने कधीही क्रमांक सोडला नाही. एका गुणाच्या अपयशानंतर नंतर तिने ज्या जिद्दीने अभ्यास केला, त्याला तोड नाही. प्राचीची बहीण स्मिता मोहिते याही आजच्या आनंद सोहळ्यात सहभागी झाल्या.

प्राची म्हणाली, ‘‘दहावीला ९६.५ टक्के गुण मिळवून विभागात पहिली आले. बारावीला ९५.६७ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला. पदवीचे शिक्षण सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये बी. टेक. पदवी घेतली. जानेवारी २०१७ मध्ये मंत्रालयात सहायक म्हणून रुजू झाले. वेगळे काही तरी करण्याची इच्छा असल्याने तेथेही मन रमेना. ८ मार्चला एसटीआय आणि १६ मार्च २०१७ ची पोस्ट केवळ एका गुणाने हुकली. नोव्हेंबर २०१७ च्या परीक्षेत प्रतीक्षा यादीद्वारे निवड झाली. एसटीआयमध्ये राज्यात पहिली आल्याची बातमी समजली आणि आठ महिन्यांपासून जे परिश्रम घेतले, त्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले.’’

‘स्पर्धा परीक्षा सर्वांचीच परीक्षा पाहते. आजही जे मुले-मुली आपली भवितव्य अनुभवत आहेत, त्यांनी एक-दोन गुणाने मेरिट हुकले म्हणून निराश न होता प्रयत्न कायम ठेवावेत. एक ना एक दिवस निश्‍चित यश मिळते, यावर विश्‍वास ठेवावा,’’ असे आवाहनही प्राची भिवसे हिने केले.

Archive

Contact Form

Send