चालू घडामोडी : ५ डिसेंबर २०१७

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर कालवश :
  • ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधनझाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • शशी कपूर यांनी 1940 पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 116 सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील 61 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.
  • 2011 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सीआयएचे संचालक माइक पोम्पिओ :
  • अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांच्या पाकिस्तान दौऱ्याला सुरुवात होणार असतानाच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएचे संचालकमाइक पोम्पिओ यांनी पाकला इशाराच दिला आहे.
  • दहशतवाद्यांच्या तळांवर पाकिस्तानने कारवाई केली नाही तर अमेरिकाच त्या तळांवर कारवाई करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
  • 'व्हॉईस ऑफ अमेरिका' रेडिओशी बोलताना माइक पोम्पिओ यांनी पाकबाबत परखड मत मांडले. 'अमेरिकेचे संरक्षण मंत्री मॅटीस आधी पाकिस्तानशी चर्चा करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानांवरील कारवाईबाबत गंभीर आहेत. जर पाकने या तळांवर कारवाई केली नाही तर ते तळ अस्तित्वात राहणार नाही यासाठी अमेरिका सर्व मार्गांचा वापर करेल, असा इशाराच त्यांनी पाकला दिला आहे.
  • तसेच पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. पाकिस्तान दिलेला शब्द पाळणार, अशी अमेरिकेला आशा आहे, असे त्यांनी नमूद केले.
महापालिकेच्या वतीने सीएसआर सेलची स्थापना :
  • स्मार्ट सिटी कक्ष, सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी (सीएसआर) सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे कामकाज सुरू झाले आहे.
  • औद्योगिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. याठिकाणी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. मात्र, त्यांचा निधी हा बाहेरील शहरात वापरला जातो. ही बाब लक्षात आल्यानंतर कामगार क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आपल्या शहरातील निधी शहरातच वापरला जावा, शहरविकासात उद्योगांना सामावून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
  • तसेच त्यातून सीएसआर सेलची स्थापना झाली आहे. त्यासाठी सन 2017-18 या अर्थसंकल्पात सीएसआर अ‍ॅक्टिव्हीटी या लेखाशीर्षाची नव्याने तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिकेने सदर सेलचे कामकाज पाहण्यासाठी विजय वावरे यांची या अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली गेली आहे. त्यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील मुख्य माहिती व तंत्रज्ञान विभाग येथे असणार आहे. प्रत्यक्ष सीएसआर सेलचे कामकाज नुकतेच सुरू झाले आहे.
कोल्हापूर-गगनबावडा आता राष्ट्रीय महामार्ग :
  • कोल्हापूर-गगनबावडा, करूळ घाट ते तळेरे या मार्गाचा समावेश 166 जी या राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. आजपर्यंत या मार्गाला तत्त्वत: मान्यता होती; पण आजपासून हा मार्ग अधिकृत राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणात वाढ होणार असून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. त्याचा विकास आराखडा करण्याचे काम यापूर्वीच चालू झाले आहे.
  • कोल्हापुरातून सध्या पुणे-बंगळूर व रत्नागिरी-नागपूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. यांपैकी पुणे-बंगळूर महामार्गास एनएच फोर म्हणून संबोधले जात असले तरी त्याचे नाव एशियन हायवे 48 असे आहे.
  • गगनबावडा मार्ग राज्य महामार्गाच्या अखत्यारित होता. त्यावर इतके खड्डे होते की, वाहनचालक गगनबावडा रस्ता वगळून अन्य मार्गाने कोकणात जाणे पसंत करत होते. आता या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्याने रस्त्याची विकासकामे वेगाने करता येतील, असे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी सांगितले.
'आयुष' उद्योग क्षेत्रात अडीच कोटी रोजगार :
  • केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'आयुष' उद्योग क्षेत्रात 2020 पर्यंत दहा लाख प्रत्यक्ष आणि जवळपास दोन कोटी 50 लाखांची अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. सरकारकडून येत्या पाच वर्षांत आयुष क्षेत्राचा तिपटीने विस्तार होईल, असे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
  • दिल्लीत आयोजित 'आरोग्य 2017' या परिषदेत प्रभू बोलत होते. 'आयुर्वेदिक, योग, निसर्गोपचार, यूनानी आणि होमिओपथीचा समावेश असलेल्या 'आयुष'ची सध्या देशांतर्गत बाजारपेठ 500 कोटींच्या आसपास आहे, तर निर्यात बाजारपेठ 200 कोटींपर्यंत आहे. अनेक नवे उद्योजक या क्षेत्रात स्टार्टअप सुरू करण्याच्या तयारीत असून, त्यांना खूप संधी आहेत.
  • आपल्या देशातील पारंपरिक औषधोपचाराच्या माहितीची एकमेकांना देवाणघेवाण व्हावी, यासाठी सरकार सर्व देशांसोबत काम करण्यास तयार आहे. सरकारने 'आयुष' क्षेत्रात 100 टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
  • भारत हा हर्बल आणि 'आयुष' उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार आहे. भारतात जवळपास 6,600 इतकी औषधी झाडे आढळून येतात. आता आपल्याला भारतीय उपचार पद्धतीला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असेही प्रभू म्हणाले.
दिनविशेष :
  • 5 डिसेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन' म्हणून पाळला जातो.
  • सन 1906मध्ये 5 डिसेंबर रोजी 'नॅशनल इन्शुरन्स कंपनी'ची स्थापनाझाली.
  • 'गौरव गिल' यांनी 5 डिसेंबर रोजी 2016 आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.


काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड

  • राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
  • गुजरातमधील निवडणुका संपल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल.
  • काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सर्व राज्यांतून मिळून सुमारे ८९ अर्ज आले होते. ते सर्व राहुल गांधी यांच्या नावाचे होते. त्यांच्याशिवाय कोणीही या पदासाठी अर्ज केला नव्हता.
  • काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणारे राहुल हे या घरातील सहावे अध्यक्ष असतील.
  • यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते.

चीनने पाकिस्तानचा आर्थिक पुरवठा थांबवला

  • भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाकिस्तानमधील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांचा आर्थिक पुरवठा चीनने थांबवला आहे.
  • चीनने निधी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग अधिकार यंत्रणेंतर्गत येणा‍ऱ्या १०० अब्ज रुपयांच्या प्रकल्पांना फटका बसणार आहे.
  • चीनने अर्थ पुरवठा थांबवल्याने डेरा इस्लाइल खान-झोब रोड, खुजदार-बसिमा रोड, रायकोटपासून थाकोटला जाणारा काराकोरम महामार्ग हे तीन मोठे प्रकल्प रखडणार आहेत.
  • चीनने नवी मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांसाठी पुन्हा निधी दिला जाणार आहे.
  • सीपीईसी हा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना ‘वन बेल्ट वन रोड’चा (ओबीओआर) महत्त्वपूर्ण भाग आहे.
  • पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्पबलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. या माध्यमातून पश्चिम चीनला अरबी सुमद्राला जोडण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
  • सीपीईसीसाठी ६० अब्ज डॉलर खर्च केले जाणार असून, यामुळे पाकिस्तानमध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे विविध प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.
  • परंतु आता चीनने आर्थिक रसद रोखल्याने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा वेग मंदावणार आहे.
  • हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे चीनच्या या योजनेला भारताने आधीपासूनच विरोध केला आहे.

दिवाळखोर कंपन्या खरेदी करण्यावर निर्बंध

  • बँकेच्या बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघालेल्या कुटुंबातील मालकांच्या कंपन्या खरेदी करण्यावर निर्बंध आणणारा वटहुकुम केंद्र सरकारने जारी केला आहे.
  • या वटहुकुमानुसार, भाऊ, जवळचे नातेवाईक, सहकारी यांच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या मोठ्या कंपन्यांना खरेदी करता येणार नाहीत.
  • या निर्णयाचा फटका साजन जिंदाल, मुकेश अंबानी, एल.के. मित्तल यासारख्या मातब्बर उद्योगपतींनाही बसला आहे.
  • तसेच कंपनी कायदा २०१३ अंतर्गत अपात्र ठरलेल्या संचालकांनादेखील अशी दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करता येणार नाही.
  • अशा या निर्णयांमुळे मोदी सरकारने देशातील किमान तीन लाख कंपन्या व त्यांचे पाच ते सहा लाख संचालक अपात्र ठरवले आहेत.
  • हे कोणीच आता बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघालेल्या ५०० कंपन्या या वटहुकुमामुळे खरेदी करू शकणार नाहीत.
  • याशिवाय दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेचा गुन्हा केलेली व्यक्ती (शिक्षा झाली नसली तरी) दोषी असल्यास तिलाही या कंपन्या खरेदी करता येणार नाहीत.

Archive

Contact Form

Send