मराठी व्याकरण : क्रियापद
- वाक्याच्या अर्थ पूर्ण करणार्या क्रियावाचक शब्दालाच 'क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- गाय दूध देते.
- आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो.
- मुलांनी खरे बोलावे.
- आमच्या संघाचे ढाल जिंकली.
धातु :
- क्रियापदातील प्रत्यय रहित मूल शब्दाला 'धातु' असे म्हणतात.
- उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.
धातुसाधीते/ कृदंते :
- धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्या शब्दांना'धातुसाधीत' किंवा 'कृंदते' असे म्हणतात.
- धातुसाधीते वाक्याचा शेवटी कधीच येत नाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
- धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
- फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते.
उदा.
- क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो.
- धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना.
- धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद)
- त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत. (खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद)
- जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. (बुडतांना- क्रियाविशेषण, बुडतांना-धातुसाधीते, पाहिले–क्रियापद)
- त्याचे हसणे लांबूनच एकू आले. (हसणे – नाम, हसणे-धातुसाधीत, आले–क्रियापद)
- (टीप :एखादे वाक्य सकर्मक किंवा अकर्मक आहे हे कसे ओळखावे. ण्याची क्रिया कोणावर होते व वाक्यातील क्रिया करणारा/ करणारी कोण असा प्रश्न विचारले असता उत्तर दोन भेटतात. म्हणजे उत्तर वेगवेगळे तर सकर्मक व जर उत्तर एकच भेटत असेल तर ते अकर्मक क्रियापद).
क्रियापदांचे प्रकार :
क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात.
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
1. सकर्मक क्रियापद -
- ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.
- वाक्यात क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो.
उदा.
- गाय दूध देते.
- पक्षी मासा पकडतो.
- गवळी धार काढतो.
- राम आंबा खातो.
- अनुराग निबंध लिहितो.
- आरोही लाडू खाते.
2. अकर्मक क्रियापद -
ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते. म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते त्यांना 'अकर्मक क्रियापदे'असे म्हणतात.
अकर्मक क्रियापदांच्या वाक्यात क्रिया करणारा व सोसणारा एकच असतो.
उदा.
- मी रस्त्यात पडलो.
- तो बसला.
- आज भाऊबीज आहे.
- तो दररोज शाळेत जातो.
- (टीप : जेव्हा ण्याची क्रिया कोणावर होते व क्रिया करणारा/करणारी कोण असे प्रश्न विचारले असता दोन्ही प्रश्नांचे उत्तर हे एकच सारखीच मिळतात त्याला 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.)
क्रियापदांचे इतर प्रकार :
व्दिकर्मक क्रियापदे -
- ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास 'व्दिकर्मक असे' म्हणतात किंवा ज्या वाक्यातील क्रिया ही कर्त्यांकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास 'व्दिकर्मक क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- आजीने नातीला गोष्ट सांगितली. (आजी – कर्ता, नातीने – अप्रत्यक्ष कर्म, गोष्ट- प्रत्यक्ष कर्म, सांगितले- व्दिकर्मक क्रियापद)
- गुरुजी विधार्थ्यांना व्याकरण शिकवितात.
- मुलीने भिकार्यायला पैसा दिला.
- (प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तूवाचक असते व त्याची विभक्ती ही प्रथमा/ व्दितिया असते.
- अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असते व त्याची विभक्ती ही नेहमी चतुर्थी असते.)
उभयविध क्रियापदे -
- जे एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास 'उभयविध क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- त्याने घराचे दार उघडले. (सकर्मक क्रियापद)
- त्यांच्या घराचे दार उघडले. (अकर्मक क्रियापद)
- रामाने धनुष्य मोडले. (सकर्मक क्रियापद)
- ते लाकडी धनुष्य मोडले. (अकर्मक क्रियापद)
अपूर्ण विधान क्रियापद -
- जेव्हा वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तेव्हा अशा क्रियापदास 'अपूर्ण विधान क्रियापद' असे म्हणतात.
- अशावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाव्यतिरिक्त ज्या शब्दांची गरज असते त्याला 'विधान पूरक' किंवा 'पूरक' असे म्हणतात.
उदा.
- राम झाला.
- राम राजा झाला. (राजा–विधानपूरक)
- मुलगा आहे.
- मुलगा हुशार आहे. (हुशार-विधानपूरक)
- (टीप : नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर नामापूर्वी आला तर त्याला विशेषण म्हणतात आणि नंतर आला तर त्याला पूरक/विधक पूरक असे म्हणतात.)
संयुक्त क्रियापद -
- धातुसाधीत व सहाय्यक क्रियापद यांचे मिळून बनलेल्या क्रियापदास 'संयुक्त क्रियापद' असे म्हणतात.
- मात्र या दोन्ही शब्दांमधून कोणत्याही एकच क्रियेचा बोध होणे आवशयक आहे.
- (धातुसाधीत+सहाय्यक क्रियापद= संयुक्त क्रियापद)
उदा.
- क्रीडांगणावर मुले खेळू लागली. (खेळू=धातुसाधीत, लागली=सहाय्यक क्रियापद)
- बाळ एवढा लाडू खाऊन टाक (खाऊन=धातुसाधीत, टाक=सहाय्यक क्रियापद)
सहाय्यक क्रियापद -
- जेव्हा धातुसाधीत व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधीताला मदत/सहाय्य करणार्या क्रियापदाला 'सहाय्यक क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
- बाळ एवढा लाडू खाऊन टाक.
सिद्ध क्रियापद -
- जा, ये, कर, ऊठ, बस, असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात व या सिद्ध धातूना प्रत्यय लागून तयार होणार्या क्रियापदाला 'सिद्ध क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- तो दररोज शाळेत जातो.
- ती खूप अभ्यास करते.
- सूर्य पूर्वेस उगवतो.
- आम्ही सकाळी लवकर उठतो.
साधीत क्रियापद -
- विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणार्याय धातूंना 'साधीत धातू' असे म्हणतात व अशा साधीत धातुंना प्रत्यय लागून तयार होणार्या क्रियापदांना 'साधीत क्रियापदे' असे म्हणतात.
उदा.
- हात-हाताळ-हाताळणे/ते/तात.
- स्थिर-स्थिराव-स्थिरावतो/ला/वेल.
- पुढे-पुढार-पुढारले/पुढारतात.
- आण-आणव-आणवली
- पाणी-पाणाव-पाणावले.
उदा.
- माझ्या कपटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो.
- तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिरावला.
- आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले.
- आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली.
- खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.
प्रायोजक क्रियापदे -
- जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदास 'प्रायोजक क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- आई मुलांना हसविते.
- तो मुलांना रडवितो.
- त्याने त्याच्या मित्राला तुरुंगातून सोडविले.
- तो मुलांना खेळवितो.
- आई बाळाला निजविते.
- तो गुरे चारतो.
शक्य क्रियापद -
- जे साधीत धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना प्रत्यय लावून जी क्रियापदे तयार होतात त्यांना 'शक्य क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- मला आता काम करवते.
- त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.
- मला दररोज 20 कि.मी. चालविते.
- बाईंना वह्या वर्गात आणवत नाही.
अनियमित/गौण क्रियापद -
- मराठीत काही धातू असे आहेत त्यांना काळांचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोडया वेगळ्याच प्रकारे चालतात, त्यांना 'अनियमित/गौण क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- मुलांनी सतत खेळू नये.
- सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
- या दरवाजाने जाऊ नको.
- परमेश्र्वर सर्वत्र आहे.
- मला कॉफी पाहिजे.
- असे वागणे बारे नव्हे.
- आई घरी नाही.
भावकर्तुक क्रियापदे -
जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना 'भावकर्तृक क्रियापद' असे म्हणतात.
उदा.
- मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.
- पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळते.
- पुण्यात जातांना कात्रज जवळ उजाडले.
- आज दिवसभर सारखे गडगडते.
क्रियापद व त्याचे प्रकार व्हीडीओ लेक्चर
